पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देणार   

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर बरेच पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लगेचच जम्मू काश्मीरला रवाना झाले आहे आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्वाची माहिती समोर आली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून, मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
 
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सहा जणांचा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. यातील दोन जणांचे पार्थिव पुण्यात नेले जातील आणि चार जणांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहेत. आमच्या मंत्र्यांवर याच्या समन्वायाची जबाबदारी देण्यात आली आहे. गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा विमानतळावर व्यवस्था पाहत आहेत. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ समन्वय करत आहेत. माधुरीताई मिसाळ याही समन्वय करत आहेत. आम्ही पर्यटकांच्या संपर्कात आहोत. ज्यांनी संपर्क साधला आहे, त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगो विमानातून परत आणले जात आहे. ही परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा आढावा घेऊन मुरलीधर मोहोळ इंडिगोला एक अतिरक्त विमान द्यावे, अशी विनंती करणार आहेत. आवश्यक तिकिटाची व्यवस्था मुरलीधर मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील पर्यटकांना त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार

मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात व्यवस्था उभ्या केल्या आहेत. माहिती देणे-घेणे सुरू आहे. जम्मूचे प्रशासनही योग्य उत्तर मिळत आहे. आवश्यक त्या व्यवस्था तेथील प्रशासन करत आहे. जखमींना उपचार सुरू आहेत. जखमींना डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले आहे, त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपये देणार आहोत. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यांच्या कुटुंबासाठी जे काही करणे शक्य होईल, ते केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही त्यांच्या परिने या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आपल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणणे याला प्राधान्य दिलेले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 
 
ही सगळी चीड आणणारी परिस्थिती आहे. अतिशय निंदनीय प्रकार घडला आहे. कुठेतरी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला विश्वास आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेमागील सूत्रधाराला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल, याबाबत माझ्या मनता शंका नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रातील नेमके किती पर्यटक तिथे अडकले आहेत, याचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. एका ठिकाणाहून आमच्याशी संपर्क केला, तिथे ४० लोक होते, दुसऱ्या ठिकाणी ५० लोक असल्याचे आम्हाला समजले. त्यामुळे आमच्याशी संपर्क होत आहे, तशी आकडेवारी समोर येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles